पुस्तक समीक्षेचा एक प्रयत्न
==================
पुस्तक : महाश्वेता
==================
पुस्तक : महाश्वेता
मूळ लेखिका : सुधा मूर्ती
अनुवाद : उमा कुलकर्णी
==================================================================
महाश्वेता
आपल्या देशी श्वेत वर्णाचे पिढ्यानंपिढ्या उदात्तीकरण होत राहिले आहे . त्यामुळे सुंदरतेची संकल्पना ही सामाजिक स्तरावरच दूषित होत गेली आणि सुंदरतेच्या व्याख्येचा एक भ्रष्ट साचा तयार झाला . त्या संचाबाहेरचं सर्वच कुरूप अशी दांभिक विचारसरणी बनली . याच विचारसरणीचा बळी म्हणजे महाश्वेता पुस्तकाची नायिका "अनुपमा" . सौन्दर्याच्या सर्वच मानकांत फिट बसणारी , पण कोड फुटलेली. आणि फक्त याच कारणामुळे अतिउच्चशिक्षित नवऱ्याकडून लग्नानंतर नाकारली गेलेली. या लावण्यवती अनुपमा चा चढउताराचा प्रवास लेखिकेने सूक्ष्मपणे "महाश्वेता" मध्ये नोंदला आहे .
स्वतःचे म्हणावे असे जे २ व्यक्ती होते ते सोडून गेल्यावर अनुपमा हतबल न होता लढण्याचा निर्णय घेते . अनुपमा खचून जाते पण तरीही मार्ग शोधते . या मार्गात अनेक अडथळे येतात पण ते अडथळेच स्वतःसोबत त्या अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती हि आणतात . एकटीचाच एक प्रवास सुरु होतो . या प्रवासात तिला नवा हवा तसा साथीदार ही चालून येतो पण नायिका ही साथीदारामध्ये मित्रच हुडकते आणि तसा मित्र तिला सापडतोही . मध्येच सोडून गेलेला नवरा अचानक माफीनाम्यासोबत भेटतो ; पश्चातापाच्या स्वग्नि मध्ये करपून निघालेला असा. पण नायिका कधीच पूर्व-विश्वाच्या पल्याड गेलेली असते ; स्वतःपुरती तरी.
अनुपमाचा प्रवास हा प्रेरणादायी आहे . तो भावनामय स्त्रीचे व त्यासोबतच स्रीशक्तीचे दर्शन घडवतो . म्हणूनच हा प्रवास वाचक अनुभवतो .
या पुस्तकाचे विशेष वेगळेपण तरल भाषेत दडले आहे . अतिशय सूक्ष्म नोंदी लेखिका नोंदत असते आणि अनुवादकाराचे हि विशेष कौतुक हे कि या नोंदी अनुवादादरम्यान हरवल्या नाहीत . कर्नाटकातील - मुंबईतील पट हा स्थानिक न राहता वैश्विक होतो हेच लेखिकेचे आणि अनुवादकाराचे यश म्हणावे लागेल . त्यामुळेच "महाश्वेता" हे पुस्तकाचे नाव वाग्भटाच्या कादंबरी मधील पात्राचे नाव न रहता श्वेत वर्णाच्या अनुपमेसम सर्वच भोगी नायिकांच्या कहाणीचे प्रतीक बनते .
=================
Visit my parent blog https://asamiakash.blogspot.in/ for other updates.
